बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सक्तवसुली संचनालया अर्थात ईडीने मोठा धक्का दिला आहे. अविनाश भोसले यांची तब्बल ४ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पुण्यातील ABIL अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा ईडीने जप्त केली आहे. या जमिनीची किंमत चार कोटी रुपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे.
मागच्या काही दिवसांपासून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित हे ईडीच्या रडारवर आहेत. गेल्याच महिन्यात त्यांची ५ तास चौकशी केली होती. मनी लाँडरिंग प्रकरणात दोघांना ईडीने समन्स पाठवलं होतं. पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे, जी जमीन सरकारी होती. या जमिनीबाबत पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीनेदेखील गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.
अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.