“
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने जोरदार झटका दिला आहे. ईडीने पहाटेच नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली व चौकशीसाठी ताब्यात घेतलं. नवाब मलिकांवरील कारवाईनंतर राजकारण चांगलच ढवळून निघालं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली पाहायला मिळत आहे.
नवाब मलिकांवरील कारवाईनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. मलिकांच्या ईडी चौकशीवरुन आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक सातत्याने जे सत्य आहे ते बोलत आले आहेत. त्यामुळे कदाचित हे झालेले असेल. इतके महिने आम्हाला धमकी देत होते त्यामुळे मला यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही. मला विश्वास आहे की नवाब मलिक जे काही खरे आहे ते सांगतील, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, कदाचित भाजपच ईडी चालवत असेल किंवा भाजप अध्यक्ष आणि ईडीचे अध्यक्ष एकच असतील. माझा यासोबत काही संबंध येत नसल्याने मला यातील काही माहिती नाही. समीर वानखडे प्रकरणात नवाब मलिकांनी अनेक भाजपच्या नेत्यांची नावे घेतली. यामुळेही त्यांना ईडीची नोटीस आली ही शक्यता नाकारता येत नाही, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.