‘महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. घोडेबाजाराबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील बोलत असतील, तर त्यांनाच तो करायचा आहे. त्यादृष्टीने त्यांनी निवडणूक लादली आहे. हे माझे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे मत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
मुंडे म्हणाले, ‘राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मतदान करायचे असते. विधानपरिषदेला मात्र तसे नसते. भाजपला राज्यसभेची निवडणूक लादायची होती, घोडेबाजार करायचा होता, म्हणून त्यांनी उमेदवार उतरवला आहे. चंद्रकांत पाटील घोडेबाजाराची भाषा करत आहेत, मात्र निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनाच घोडेबाजार करायचा आहे.’
नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर करण्याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या मागणीकडे मंत्री मुंडे यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, ‘लोकशाहीत सर्वांना आपापले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे त्यांनी मत मांडले असावे. महाविकास आघाडी सरकारची याबाबत भूमिका स्पष्ट आहे.
मात्र पाच वर्षे भाजपचे सरकार असताना त्यांनी नामांतर का केले नाही? हनुमान चालिसासह राज्यात भाजप व मनसेकडून सुरू असलेल्या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. करुणा मुंडे यांच्याकडून होत असलेल्या आरोपाबाबत ‘सॉरी… नो कॉमेंट्स’ असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.