दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहात १० एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा हिंसा झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मांसाहाराला विरोध करत विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्र संघाने केला आहे.nया घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत जेएनयूएसयूमधील काही विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विरोध केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘भाजपचे नवहिंदुत्ववादी देशात ‘फाळणीपूर्व’ परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. डॉ. अभय बंग यांचे म्हणणे असे की, संघाने स्थापनेनंतरच्या काळात कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही. या काळात ते त्यांना अपेक्षित समाजमन घडविण्याचे काम करीत होते. यासाठी त्यांनी शिक्षण, विविध संस्था, साहित्य, नाटक व इतर साधनांचा वापर केला. डॉ. बंग यांनी जे विचार व्यक्त केले ते ‘जेएनयू’पासून कर्नाटकपर्यंत खरे होताना दिसत आहेत. धार्मिक द्वेषाचे राजकारण देशाचे पुन्हा तुकडे तुकडे करील. बालमनावर रुजवलेले द्वेषाचे बीज ही पिढी संपल्यावरच संपेल, असे डॉ. बंग सांगतात. त्याआधी असंख्य फाळण्यांचे बीजे रुजलेली असतील. नवहिंदुत्ववादी उन्मत्त लोकांना याची चिंता वाटेल काय?’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘भाजपचे हिंदुत्व मतलबी आणि तकलादू आहे हे आता स्पष्टच झाले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यापासून दंगली घडविण्यापर्यंत या मंडळींचा हातभार असतो हा संशय गडद होत आहे. एका बाजूला अखंड हिंदुस्थानचे गिरमिट चालवायचे व दुसऱ्या बाजूला धर्मांध तेढ निर्माण करून देशाचे तुकडे तुकडे होतील असे वातावरण निर्माण करायचे याला हिंदुत्व किंवा हिंदू संस्कृती म्हणता येणार नाही. ‘भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे. आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्वाला नव्हे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा म्हणाले आहेत ते यामुळेच. असे अग्रलेखात म्हंटले आहे.