मुंबई | शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावून मंगळवारी सकाळी ११:०० वाजता ईडी कार्यालयात बोलावले आहे. आता त्या पाठोपाठ शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या सुद्धा पाच संस्थांवर सकाळी ईडीने धाड टाकली आहे. या कारवाईमुळे एकचं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, भाजपा खासदार किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन भावना गवळींवर निशाणा साधला आहे.
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सोमैय्या यांनी भावना गवळी ह्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राईट हँड असल्याचं म्हटलं आहे. भावना गवळींच्या अनेक संस्थांवर ईडीने आज छापेमारी केली असून यापुढेही ही कारवाई होईल. भावन गवळींनी आपल्या बालाजी आर्टीकल फोर्ट कारखान्यासाठी ४४ कोटी रुपये भारत सरकारच्या बँकेचे कर्ज घेतले, ११ कोटी रुपये कर्ज स्टेट बँकांकडून घेतले. विशेष म्हणजे हा 55 कोटी रुपयांचा कारखाना आपल्याच बेनामी कंपनी असलेल्या भावना अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडला केवळ २५ लाख रुपयांत विकला, असा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.