शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंना करण्यात आलेल्या अटकेवरून घणाघाती टीका केली आहे. फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हे सूचक विधान केलं. नाशिकमध्ये शिवसेनेचे वातावरण आहे. सरकारला नाशिक सारख्या शहरांची ताकद मिळत राहिली पाहिजे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. कार्यक्रम केल्यावर परिणामांची पर्वा करत नाही, असं राऊत म्हणाले. राऊत यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा सेना–भाजपा यांच्यातील वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात भाजपच्या भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनीही मोदींच्या आदेशानुसार जनआशीर्वाद यात्रा काढली. पण त्यांनी कुणीही शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली नाही. पण यात एकच अतिशहाणा निघाला. मुंबई विमानतळावर उतरल्यापासून त्यांनी खालच्या शब्दांत टीका सुरू केली होती. पण आपण नेहमी सभ्यता पाळत आलोय. बाळासाहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. उगाच कुणाला अंगावर आम्ही घेत नाही आणि कुणी अंगावर आलंच तर सोडणार नाही. यांची यात्रा ही यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा होती”, असं संजय राऊत म्हणाले.