नवी दिल्ली | मानवाधिकाराच्या नावाखाली भारताविरुध्द गळे काढणारे अरुंधती रॉयपासून ते पीटर फ्रेडरिक, हर्ष मंदार, भजनसिंग भिंडर पर्यंत अनेकांना पाकिस्तानकडून मदत मिळत आहे. त्यांच्यासह अनेक जण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताविरुद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लॉबिंग करत आहेत, असे इन्व्हेस्टिगेटिंग इन्फो-वॉरफेअर आणि साय-वॉर डिसइन्फो लॅबने केलेल्या तपासणी अहवालात उघड झाले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या हितसंबंधांना हानी पोहोचवण्यासाठी पाकिस्तान ५० वर्षांपासून प्रयत्न करत आहे. डिसइन्फो लॅबने आपल्या अहवालात म्हटले आहे की, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या युनायटेड स्टेट्स कमिशन आॅन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम च्या वार्षिक अहवालात भारताला मिळालेल्या रेटिंगसाठी पाकिस्तान आणि तिची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय संबंधित विविध संघटना जबाबदार आहेत. भारताला पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन आणि इतर 11 राष्ट्रांसह विशेष चिंतेचा देश म्हणून गटात समाविष्ट करण्यात आले.
भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टीींचा समावेश आहे. फॅसिझमचा आरोप करणे, नरसंहार करणे आणि इस्लामोफोबिया वाढविणे असे आरोप भारतावर केले जातात. डिसइन्फो लॅबने निदर्शनास आणून दिले आहे की भारतातील कथित मानवाधिकार उल्लंघनाबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांना त्यासाठी फंडींग केले जाते. यासाठी पाकिस्तान समर्थित संस्था अमेरिकेत काम करते.