नवी दिल्ली | पेगासस स्पायवेअरद्वारे फोन टॅपिंग केली जात असल्याच्या मुद्द्यावरून देशभर खळबळ उडाली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोन टॅप करून त्यांची हेरगिरी केल्याचं वृत्त आल्याने काँग्रेसमध्ये एकाच खळबळ उडाली आहे. याच हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणीच काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार लोकशाही विरोधी आहे, असं सांगतानाच भाजपने आता आपलं नाव बदलून भारतीय जासूस पार्टी ठेवायला हवं, अशी खोचक टीकाही सुरजेवाला यांनी केली आहे.
यावेळी काँग्रेसने राहुल गांधींची हेरगिरी केल्याचा भाजपवर आरोप केला. केवळ राहुल गांधीच नव्हे तर इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही हेरगिरी करण्यात आली आहे. राहुल गांधी, त्यांचा स्टाफ एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने त्यांचे केंद्रीय मंत्री, पत्रकार आणि कार्यकर्त्यांची हेरगिरी केली. हे अतिरेकीपणाचं लक्षण नाही का?, असा सवाल सुरजेवाला यांनी केला.