मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून अशातच आता भाजपच्या पोल खोल सभेच्या स्टेजची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचं समजतंय. कांदिवलीतील शिवसेनेचे शाखाप्रमुख सचिन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हा स्टेजची तोडफोड केली. यावेळी शिवसैनिकांनी झिंदाबादच्या घोषणाही दिल्या होत्या.
सोमवार सायंकाळी 7 वाजता भाजपचा मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात पोल खोल सभा आयोजित केली आहे. कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी या जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. या सभेला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार प्रमुख प्रवक्ते असणार आहेत.
कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर आज संध्याकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी मध्यरात्रीपासून स्टेज बांधण्याचं काम सुरु होतं. मात्र सभेच्या स्टेजचं काम सुरु असतानाच रात्री एकच्या सुमारास शिवसैनिक तिथे जमले आणि त्यांनी भाजपच्या या सभेच्या स्टेजटी तोडफोड करुन तो उद्धवस्त केला.
या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या परिसरात सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.