गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केली होती. या टीकेनंतर अमृता फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करून भाई जगताप यांचा समाचार घेतला होता.
“ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बँके ‘ ला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. मात्र या ट्विटनंतर जगताप यांनी उत्तर देणे टाळले होते,
आता या प्रकरणात भाजपा नेते निलेश राणे यांनी उडी घेत भाई जगताप यांना टोला लगावला आहे. भाई जगताप तो टपोरी आहे, ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्यामुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं” असा टोला राणे यांनी लगावला आहे.यावर आता भाई जगताप काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.