बेळगाव : शहरातील रामलिंग खिंड येथील रस्त्यावर शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी केला आहे. सदर रुग्णवाहिकेला पोलिसांचे संरक्षण असताना सुद्धा हा प्रकार घडल्यामुळे सीमाभागात वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या झालेल्या हल्ल्यात रुग्णवाहिकेचा बोर्ड तोडण्यात आला तसेच गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. हा प्रकार घडत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले असता कानडी कार्यकर्ते घटनास्थळावरुन पळून गेले. हा प्रकार घडल्यानंतर सदर ठिकाणी काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, बेळगाव शहरातील रामलिंग खिंड या परिसरात शिवसेना पक्षाच्या रुग्णवाहिकेवर कानडी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यामध्ये शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच या रुग्णवाहिकेचा बोर्डसुद्धा तोडण्यात आला. हल्ला झाल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना पळवून लावले.
दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर बेळगावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी सुरु केल्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर तसेच शिवसैनिक प्रविण तेजम यांनी केला आहे.