बार्शी (अनिल जाधव-राजकीय कट्टा प्रतिनिधी)बार्शीचे राजकारण हे महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे. याठिकाणी माजी मंत्री दिलीप सोपल व आमदार राजेंद्र राऊत या दोन गटातच गेल्या पाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत.गटातच या अर्थाने की या ठिकाणी हे दोन नेते ज्या पक्षाकडे जातात तो पक्ष याठिकाणी प्रबळ मानला जातो. कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसआणि शिवसेना या दोन पक्षात अनुक्रमे मा.आ.दिलीप सोपल व आ.राजेंद्र राऊत होते त्यावेळी हे पक्ष याठिकाणी प्रबळ होते.त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी पक्षांतर करत काँग्रेस पक्षाला आपलंसं केलं त्यावेळी बार्शीत काँग्रेसला चांगले दिवस आले तर त्याच वेळी दिलीप सोपल हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा जवळ केले. त्यामुळे एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातच येथील स्थानिक निवडणुका झाल्या. त्यानंतर माजी मंत्री दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना जवळ केली तर त्यापूर्वीच राजेंद्र राऊत यांनी देखील काँग्रेस- -शिवसेना व्हाया भाजपा असा प्रवास केला होता. त्यामुळे बार्शीत पक्ष बदलणे हे कपडे बदलल्या सारखे आहे असे देखील म्हटले जाते.कोणत्याही नेत्याला पक्षाच्या निष्टेविषयी बोलण्याचा तसा अधिकार बार्शीत नाही हे मात्र नक्की.
बार्शीचे माजी नगराध्यक्ष व बार्शीच्या राजकारणात गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून ज्या कुटुंबाचा दबदबा आहे असे कुटुंब म्हणजे बारबोले यांचे होय. बारबोले यांच्या कुटुंबातील स्व.अर्जुनराव बारबोले त्यानंतर विश्वासराव बारबोले त्यानंतर अरुण दादा बारबोले व आता विश्वासराव बारबोले यांचे पुत्र कृष्णराज बारबोले हे राजकारणात कायम सक्रिय आहेत. मात्र बारबोले यांचे राजकारणात जेवढे नाव आहे त्या नावाप्रमाणे त्यांना राजकारणात आतापर्यंत जम बसवता आला नाही. याला कारण म्हणजे बारबोले कुटुंब हे नेहमी कोणाच्यातरी आश्रयाला राहिल्यामुळे ते ज्यांच्या आश्रयाला जातात तो नेता मोठा झाला मात्र बारबोले कुटुंब आर्थिक दृष्ट्या संपन्न झालं असलं तरी राजकीय दृष्ट्या मात्र त्यांना दुय्यम व सहाय्यक नेत्याचीच भूमिका घ्यावी लागली.
आता मात्र कृष्णराज बारबोले यांनी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राजेंद्र राऊत यांच्या गटातून निवडून येऊन देखील त्यांनी आता सवतासुभा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बार्शीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ.रोहित पवार हे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी तत्कालीन उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले हे हजर होते. त्याचवेळी बारबोले कुटुंबीय हे राष्ट्रवादीकडे झुकले असं वाटत होतं मात्र त्यांनी विधानसभेला बार्शीत संधी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही तो का केला नाही? हा प्रश्न सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना निश्चितच पडलेला आहे. मात्र तरीदेखील “देर आये दुरुस्त आये” या म्हणी प्रमाणे नगरपालिकेची सत्ता भोगल्यानंतर मात्र बारबोले कुटुंबीय राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा बातम्या सध्या सोशल मीडिया वर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत व या बातम्यांना बारबोले कुटुंबीयही व्यक्तिगत पातळीवर बोलताना दुजोरा देताना दिसून येत आहेत. त्यातच मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एका विवाह समारंभात बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी भेट घेत त्यांना फ्रेम गिफ्ट केली तर सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट बारबोले कुटुंबीयांनी घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. आता बारबोले कुटुंबीय खरंच राष्ट्रवादीत जाणार की केवळ चर्चाच होणार हेही येणाऱ्या काही दिवसातच समजणार आहे. नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बारबोले कुटुंबीय जर राष्ट्रवादीत गेले तर मात्र बार्शीत नक्कीच तिरंगी लढत पुन्हा एकदा पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही.