नागपूर | नागपूर महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना सर्वच पक्षांनी मोर्चबांधणी सुरु केली आहे. त्यातच लसीकरण केंद्रांवरुन प्रचाराची संधी नगरसेवक सोडत नाहीत. तसेच अनेकांनी लसीकरण केंद्रावर बॅनर लावून निवडणुका पूर्वीच प्रचार सुरु केला आहे.
अशातच नागपूरातील काही लसीकरण केंद्रावर भाजपचे बॅनर्स लागल्याची तक्रार काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आढावा बैठकीतूनच थेट नागपूर पोलीस आयुक्त आणि नागपूर महानगरपालिका आयुक्तांना फोन केला. लसीकरण केंद्रावरील भाजपचे बॅनर्स काढण्याच्या सूचना दिल्या.
नागपूर महानगरपालिकेत गेल्या १५ वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. आता निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने पुन्हा एकदा भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मैदानात उतरले आहेत. याचाच एक भाग म्हणून कोरोना लसीकरण केंद्रांवर बॅनर्सवरुन काँग्रेस भाजप आमनेसामने पहायला मिळाली.
काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणूकीची तयारी सुरु केलीय. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या आणि भाजपला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिले.
