राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री ठाकरे आणि आघाडी सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. त्यात एक वर्षापूर्वी पालघर येथे झालेल्या साधू हत्याकांडाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चाहते शिवसेना पक्षाला डिवचले आहे.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे, अशा शब्दात दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज्य सरकारवर या प्रकरणावरून टीका करतानाच प्रवीण दरेकर यांनी आज मंत्रालयाजवळ लाक्षणिक उपोषण देखील केले. याबातची माहिती दरेकरांनी ट्विटद्वारे दिली. पालघर साधू हत्याकांडाची त्रयस्त एजन्सीमार्फत चौकशी झाली, तरचं साधूंना न्याय मिळू शकेल. आज भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासमवेत मंत्रालयाजवळ राज्य सरकार विरोधात लाक्षणिक उपोषण केले.