: शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा सिनेमा आला आहे. या सिनेमाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. यातील आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक यांचंही कौतुक होत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा सिनेमा आल्याने त्याचा प्रचंड गवगवा सुरू आहे. आनंद दिघे यांच्या पोस्टरला शिवसेनेकडून दुधाचा अभिषेकही करण्यात आला आहे.
आज एकीकडे हे सर्व सुरू असतानाच भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री आहे. दीघेंचे शिष्य एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री आहेत. शिंदेंचे चिरंजीव खासदार आहेत. पण सत्तेच्या सारीपाटात दिघे कुटुंबीय कुठे आहे? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेला डिवचले आहे. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, ‘शिष्य’ एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारीत धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला. पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.