मुंबई | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी बाबासाहेब पुरंदरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
महाराष्ट्रामध्ये जो इतिहास लोकांपर्यंत पोहोचला नव्हता तो बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या वाणीतून, लेखनीतून आणि नाट्यकृतीमधून जगभरात पोहोचवला. बाबासाहेब पुरंदरे हे फक्त शिवशाहीर नव्हते तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचे एक अविभाज्य अंग होते. प्रत्येकाच्या कुटुंबात कोणत्या ना कोणत्या रुपाने त्यांना स्थान होते. शिवसेना परिवाराशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नसले तरी इतिहासाच्या पाना पानांवर यापुढे आपल्याला आढळतील. इतिहास कसा सांगावा आणि कसा पोहोचवावा याचे ते आदर्श परिपाठ होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे राऊत म्हणाले की, बाबासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. बाळासाहेब ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे होते. अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासंदर्भात ते बाबासाहेबांसोबत चर्चा करत असे. दोघांनाही इतिहास घडवण्याचे वेड होते. बाबासाहेब इतिहास सांगत होते आणि बाळासाहेब त्याचा आधार घेऊन इतिहास घडवायचा प्रयत्न करत होते. दोघांमध्येही अतूट नाते होते. मातोश्रीवरुन जेव्हा बाळासाहेबांची अंत्ययात्रा निघाली आणि शिवाजी पार्क येथे पोहोचली तेव्हा एका इमारतीच्या खिडकीमध्ये बाबासाहेब उभे होते तेव्हा त्यांना भावनाविवष होऊन बाळासाहेबांना अभिवादन करताना आम्ही पाहिले, असे संजय राऊत यांनी म्हटले.