मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केले. तसेच आंदोलकांनी पवारांच्या घरावर चपला आणि दगडी फेकली होती. मात्र अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शरद पवारांच्या घरावर झालेल्या या आंदोलनावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘या जन्मी जे करतो ते याच जन्मी फेडावे लागते, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. या गोष्टीपासून कोणी वाचू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
उदयनराजे भोसले यांनी केलेल्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या काही, हे बोलणारे कोण होते, हे कालपर्यंत राष्ट्रवादी होते नंतर भाजपात गेले आहेत, ते शरद पवारांविरुद्ध बोलत होते. हा हलकटपणा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.