शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे १४ तारखेला जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे १४ तारखेनंतरच खरी पोलखोल सभा घेणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आपल्या बूस्टर डोस सभेत केला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर घणाघाती टीका करताना बाबरी पाडल्याचा शिवसेनेचा दावाही त्यांनी खोडून काढला.
येथील सोमय्या मैदानात भाजपची बूस्टर डोस सभा झाली. यावेळी फडणवीसांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजप नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, बाबरी पडली, तेव्हा कोणत्या बिळात होतात, असा सवाल शिवसेना करते, पण आम्ही बाबरी ढाचा पाडला. बाबरी ढाचा पाडल्याप्रकरणी ३२ जणांवर खटला चालला. त्या ३२ जणांमध्ये शिवसेनेचा एकही नेता नव्हता. नुसते मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले, तर यांची हातभर फाटली आणि म्हणे यांनी मशीद पाडली, अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेच्या दाव्याची खिल्ली उडवली.
ज्यात महाविकास आघाडी सरकारने आणीबाणी आणून ठेवली. बिल्डर, दारू दुकानदार, विदेशी मद्यपींना मदत केली. पण बारा बलुतेदारांना काहीच दिले नाही. मुख्यमंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम माहित होते, पण सरकारचे आता वर्क फ्रॉम जेल सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.