पुणे | बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती? बाबरी पाडली त्यावेळी आपण तिथं उपस्थित होतो, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काल झालेल्या भाजपाच्या सभेत केला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी खोचक टीका केली आहे. बाबरी पाडली गेली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं? असा सवाल रुपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामागे भाजपाचा हात आहे. मुख्यमंत्रीपदाची आस लावून बसलेले देवेंद्र फडणवीस हे सर्व करत आहेत, असा आरोप रुपाली पाटील यांनी यावेळी केला. राज ठाकरे यांच्या कालच्या औरंगाबादमधील भाषणात सर्वाधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होती. त्यावरही रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“काही प्रवृत्तींचा राज्यात दंगली घडवण्याचा कट आहे. मात्र तसं राज्यात होणार नाही. महाविकास आघाडी यासाठी भक्कम आहे. राज ठाकरेंच्या भाषणात अनेक मुद्दे आले आहेत आणि त्याची तपासणी पोलीस करत आहेत. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या भाषणामुळे जर काही घटना झाल्या तर कारवाई होईलच”, असं रुपाली पाटील म्हणाल्या.