औरंगाबाद | एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी आज संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारीस पठाण हे उपस्थित होते. ओवेसींच्या या कृत्याबद्दल महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाल्याबद्दल शिवसेना नेते व संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर कुणीही जात नाही. तिथे जाऊन ओवेसीने त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल खैरे यांनी निषेध नोंदवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीही ओवेसींवर याबद्दल टीका केली आहे. एमआयएमचे खासदार जलील यांनी मात्र ओवेसींच्या कृतीचे समर्थन केले आहे. याच मुद्दयावरून आता औरंगाबादेतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे आहे तसेच शिवप्रेमींकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.