पुणे | मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबादेत होणाऱ्या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज पुणे ते औरंगाबाद दौराही चर्चेत आहे. सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांनी या दौऱ्याची आखणी करण्यात आलीय. आणि औरंगाबादच्या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं केला आहे. पुणे ते औरंगाबाद प्रवासात राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागतही केलं जाणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या.
अशातच याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची उद्या सभा होतेय. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवलाय. तसंच ते भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे उद्या कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता लागली आहे.