औरंगाबाद | शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. वाहतुक कोंडी सोडवताना आमदार अंबादास दानवे यांनी एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार शहरातील गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांती चौकात रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणामुळे ट्राफिकजॅम झाले होते. त्यावेळी जवळच असलेल्या शिवसेना कार्यालयात आमदार दानवे यांना याची माहिती मिळाली. यानंतर वाहतूक नियोजनासाठी शिवससैनिकांना सोबत घेऊन दानवे यांनी वाहतूक पोलिसांची मदत केली.
यावेळी एक रिक्षाचालक बेशिस्तपणे रिक्षा पळवत होता. हे पाहून दानवे यांनी रिक्षा अडवून त्या रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे. तसेच ट्राफिक पोलिसांनी यावेळी त्या रिक्षाचालकाला समज सुद्धा दिली होती. आज नियम धाब्यावर बसवून गाडी चालवणाऱ्यामुळे ट्रॅफिकच्या समस्या निर्माण होताना दिसत आहे याकडेच आमदार दानवे यांनी लक्ष वेधून घेतले होते.