मुंबई | कोकणासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदयांना पूर आला आहे. कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीच्या परिसरात गेल्या ८ दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे या नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. पुराचं पाणी पुणे-बंगळुरु हायवेवर आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पुराच्या पाण्यामुळे हायवेवर तब्बल 20 किलोमीटरची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीसुध्या राज्य सरकारनं तातडीनं पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करुन समन्वय स्थापित केला पाहिजे असा सल्लाही फडणवीसांनी सरकारला दिला आहे.
‘कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज आहे. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करून समन्वय स्थापित केला पाहिजे. कर्नाटकच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने नंतर हा विसर्ग योग्य दाबाने होण्यात अडचणी निर्माण होतात आणि कोल्हापूर व सांगलीच्या भागात पाणी पातळी वाढत जाते. त्यामुळे आताच अधिकचा विसर्ग कसा करता येईल, याचा प्रयत्न करावा’, असं ट्वीट करुन फडणवीसांनी ठाकरे सरकारला महत्वाचा सल्ला दिलाय.