मुंबई : राज्यात कोरोनाने आपलं डोकं परत वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. आज मुंबई, पुणे ,औरंगाबाद, विदर्भात या सारख्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आज नागपूरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकाराच्या अपयशाबद्दल टीकास्त्र सोडले. तसेच सरकार कोरोना प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करत असून ते पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जास्त लक्ष देत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना सरकार मात्र पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंग आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील हे हजारोंच्या बैठका घेत आहेत. अशा बैठकांमुळे कोरोना विषाणू सुपर स्प्रेडर बनत आहे. पण याकडे सरकारातील नेत्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवार आणि जयंत पाटलांवर FIR दाखल करायला पाहिजेत, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.