मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १ मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर देखील राज ठाकरेंनी टीका केली. शरद पवार हे त्यांना जे सोयीचे आहे तेच वाचतात. जेम्स लेन आणि दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचा संबंध दाखवून मराठा समाजाची माथी भडकविण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरे यांनी घराघरात पोहोचविले, परंतु ते ब्राह्मण असल्याने त्यांचा द्वेष केला, असा आरोपही राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला होता.
राज ठाकरेंच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेते त्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांच्यावर पलटवार केला आहे. विविध राजकीय नेत्यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडविणाऱ्या राज ठाकरेंचीच नक्कल करत आता अजित पवारांनी निशाणा साधला आहे.
राज ठाकरे कधी दुपारी भर उन्हात सभा घेत नाहीत. सूर्य मावळला, संध्याकाळ झाल्यानंतर वातावरण चांगले झाले की मग हे सभा घेतात. मग ते नॅपकिनने तोंड पुसत असतात. ( यावेळी अजित पवार यांनी नॅपकीन मागवला आणि राज ठाकरे यांची तोंड पुसण्याची नक्कल केली) ते काय पुसत असतात काय माहीत. काय एकदाचं आहे ते पुसून घे आणि मग बोल ना. सारखं सारखं काय नाकाला नॅपकिन लावायाचा, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.