गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चिला जात आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
राज्यात रखडलेला निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यावरून विरोधकांनी टीकेचे रान उठवले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्पष्ट झालेलं आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी 27 टक्के तिकीटे ओबीसींना देऊन समाजाला न्याय देईल. भाजपा निवडणुकीसाठी सदैव सज्ज असतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटलांनी यावेळी बोलताना मागील निवडणुकांचा दाखला दिला आहे. जिल्हा परिषदांच्या ओबीसींच्या आरक्षित जागा रद्द होऊन झाल्या होत्या. त्यावेळी भाजपने खुल्या झालेल्या ओबीसींच्या जागेवर तिकीटे देऊन निवडून आणले होते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.