राज्यामध्ये येत्या काही दिवसात मनपा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार का? असा सवाल उपस्थित होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, आगामी निवडणुकीत राज्यस्तरावर महविकास आघाडीनं एकत्र लढली जावी असे आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र जिल्हा स्तरावर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा आहे, असं अजित पवार म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नाना पटोले यांनी खंजीर खुपसण्याचं वक्तव्य केलं हे हास्यास्पद आहे. मात्र नाना पटोले कुठल्या पक्षातून आले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग भाजपने म्हणायचं का की नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला, असा टोला त्यांनी लगावला.
अजित पवार म्हणाले की, राज्य स्तरावर वेगळे निर्णय असतात मात्र स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय होतं असतात. काँग्रेसला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसाच आम्हाला देखील पक्ष वाढवण्याच्या अधिकार आहे. राज्यस्तरावर आमची शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यामधे त्यांनी देखील आम्हाला हेच सांगितलं आहे. नाना पटोले यांनी सांगावं की त्यांनी आधी काँग्रेस सोडून भाजप, मग भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले. झाकली मूठ सव्वा लाखाची असते, असंही ते म्हणाले.