नवी दिल्ली | आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना-भाजपा यांच्यात जोरदार वदिवाड सुरु झाले असून खासदार संजय राऊत यांनी लेटर बॉम्ब टाकत भाजपावर निशाणा साधला आहे. त्याला आता भाजपा नेत्यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागिर नाही, घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे अशा शब्दात भाजपा आमदार अमित साटम यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
अमित साटम म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला म्हणून किरीट सोमय्यांवर भेकड हल्ले करायचे असा प्रकार संजय राऊतांनी सुरु केला आहे. त्यात प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच राऊतांचे मानसिक संतुलन ढासळले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नव्हे. पण तुमच्या सारख्यांना तुमच्याच भाषेत बोलायचे तर तुम्ही एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद पाहा. हे या मराठ्याचं तुम्हाला खुलं आव्हान आहे असा इशारा साटम यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना दिलं आहे.