सोमवारी कोर्टात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून पैसे गोळा केल्याचा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला होता. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनीही याबाबत मोठा खुलासा केला आहे. गुणरत्न सदावर्तें आणि अॅड. जयश्री सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी केला आहे.
संजय मुंडे म्हणाले, अजयकुमार गूजर यांनी पैसे जमा करायला सांगितले होते. त्यानुसार अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयात फॉर्म भरून घेतले गेले. प्रत्येक कर्मचाकडून ५४० रुपये घेतले गेले. याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी पुण्यातून 1 लाख 10 हजार रुपये जमा केले होते. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आमची फसवणूक केली आहे.
तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर जो एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला तो हल्ला चुकीचा होता, असेही संजय मुंडे यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण लवकर करायला पाहिजे होते हे केले नाही मंत्री अनिल परब यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले माझी नोकरी जाईल म्हणून मी परत कामावर आलो, असे संजय मुंडे म्हणाले.