जळगाव : मी पुन्हा येईन, म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेसाठी जीव गुदमरत आहे, मात्र आता पुन्हा ते मुख्यमंत्री होत नाहीत, असा टोला राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. त्याबाबत नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, कैलास पाटील, मनीष जैन आदी उपस्थित होते.यावेळी खडसे म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मजबूतीने काम करीत आहे. त्यामुळे विरोधक सरकारवर आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आघाडीचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे.
ते पुढे म्हणाले, मी देखील विरोधी पक्षनेता होतो. आपण सरकारवर आरोप केले परंतु व्यक्तीगत दुश्मनी केली नाही, सध्या विरोधकांचे सत्तेसाठी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपाचे नेते दिशाभूल करीत असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले
राज्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. खडसे म्हणाले, मी पुन्हा येईलच्या नादात देवेंद्र फडणवीस खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे जनतेने आता तुम्हाला नाकारले आहे. आता ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.