मुंबई | देशभरात गाजत असलेल्या हिजाब वादावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नसून हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही. तसेच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. आता कोर्टाच्या या निकालांनंतर विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मत प्रकट केले आहे.
“सर्वांना आपला धार्मिक अधिकार आहे. मात्र शिक्षण संस्था या नियमांनी, कायद्यांनी चालल्या पाहिजे. शिक्षण संस्थामधील ड्रेस कोड सर्वांनी मानायलाच हवा. जर असे अनुशासन नाही ठेवले तर उद्या कुणी मिलिट्री मध्ये जाऊन म्हणेल की, मला मिलिट्री ड्रेस नको. कारण तो माझ्या धर्माचा नाही. त्यामुळे असे नाही होऊ शकत. नियम-कायदे आपल्या जागेवर आहेत. आणि धार्मिक स्वातंत्र्य आपल्या जागेवर आहे. त्यामुळे कर्नाटक न्यायालयाने एक स्पष्ट निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तरी हिजाबवर ‘controversy’ करणाऱ्यांनी चूप बसावे.”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
त्याचप्रमाणे कर्नाटकातील शाळेतील हिजाब बंदीवर कोर्टाकडूनही आता शिक्कामोर्तब झाले आहे. उडूपीच्या मुलींनी कोर्टात याचिका दाखल करून शाळेत हिजाब परिधान करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत विद्यार्थी शालेय गणवेश परिधान करून येण्यास नकार देऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.