नवी दिल्ली | पंजाबमध्ये ‘आप’ने काँग्रेस आणि भाजपाला ‘जोर का झटका’ दिल्याचं दिसत आहे.सध्या सुरू असलेल्या मतमोजणीत पंजाबमध्ये आम आदमी पक्ष इतर पक्षांच्या तुलनेत खूप पुढे दिसत आहे. पंजाबमधील सुरुवातीचे कल पाहिल्यावर आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आप आता राष्ट्रीय शक्ती आहे, अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील. आप आता देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल” असं म्हटलं आहे. तसेच निकालाबद्दल आनंद व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. अरविंद केजरीवाल यांना याचे श्रेय जाते. या निवडणुकीत पंजाबच्या जनतेने आम्हाला ही भेट दिली आहे असंही म्हटलं आहे.
“लोकांच्या खिशातून पैसे काढून हे लोक आपले महाल सजवत आहे. आज यांच्या महालात लावण्यात आलेली एक एक विट ही सामान्य माणसाच्या कष्टाची आहे. या संपूर्ण व्यवस्थेला बदलायचं आहे. आज भारताच्या इतिहासातील मोठा दिवस आहे. येणाऱ्या दिवसांत आप काँग्रेसचं रिप्लेसमेंट बनेल” असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे. आम आदमी पार्टीचे गोपाल राय यांनी “आतापर्यंतचे कल हे सकारात्मक आहेत. जे काही निकाल येतील तेही सकारात्मक असतील. पंजाबच्या जनतेचे आम्ही आभार मानतो. त्यांनी बदलाच्या दिशेनं आम्ही केलेल्या संकल्पाला पूर्ण केलं आहे” असं म्हटलं आहे.
पंजाबमध्ये मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसनं पराभव स्वीकारला. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत. मुख्यमंत्री आपल्या सरकारी निवासस्थानी पोहोचले आहेत. पंजाबमध्ये ‘आप’ने मुसंडी मारली असून सुरुवातीच्या कलांमध्ये ६४ जागांवर आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये काही वेळापूर्वी आघाडीवर असलेले काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धू हे पिछाडीवर गेले आहेत. ते आता दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी दोन जागांवर पिछाडीवर आहेत.