मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची शिवसैनिकांकडून गेली कित्येक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. आता तो दिवस आला आहे. आज औरंगाबाद शहरात 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.विशेष म्हणजे सभेपूर्वीच आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. तसेच आज संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार असे शिवसेनेने म्हंटले आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज ८ जून रोजी याच मैदानावर होणार असून या सभेपूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ट्विटद्वारे संदीप देशपांडे म्हणाले, “तत्वा साठी सत्तेवर लाथ मारणारे मा.बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे”.
राज्यसभा निवडणूक जवळ आल्या आहेत. सहाव्या जागेसाठी आवश्यक असलेल्या मते जुळविण्यासाठी शिवसेना आणि भाजपची कसरत पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेनेकडून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचीही मदत घेतली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या मुद्द्यावरूनच संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे