परळी | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी येथे सुरू असलेल्या भीम महोत्सवांतर्गत शनिवारी सायंकाळी सुप्रसिद्ध सिने गायक आदर्श शिंदे यांच्या कडक आवाजात भीम गीतांचा जबरदस्त कार्यक्रम परळी येथे संपन्न झाला या कार्यक्रमास शेकडो महिलांसह हजारोंचा निळा सागर उसळला होता.
भीमा कोरेगाव, सोनियाची उगवली सकाळ, लाल दिव्याच्या गाडीला यासह भीमराव कडाडला, आदी जोशपूर्ण गीतांवर अनेकांनी ठेका धरलेला पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या स्थळी आदर्श शिंदे यांचे आगमन होताच प्रचंड आतिषबाजी करण्यात आली, यावेळी महिलांसह सर्वांना निळे फेटे घातल्याने परिसर निलमय झाला होता. हातातील निळे झेंडे, तरुणाईचा जल्लोष आणि बहारदार भीमगीते, या सर्वांनी एकत्रित वातावरणात रंगत आणली होती!

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. आमचे नेते ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात भीमजयंतीचा हा तीन दिवसीय महोत्सव आम्ही यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. भीम जयंतीची परळीतील ही परंपरा मुंडे साहेबांच्या नेतृत्वात अबाधित राहील. धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वात सुरू झालेली भीम महोत्सवाची परंपरा आता वटवृक्षाचे रूप घेत आहे, असे मत माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यक्रमाच्या वेळी फोनवरून आदर्श शिंदे व त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या आवडीचे ‘अरे सागरा, भीम माझा इथे निजला, शांत हो जरा…’ या गीताची आदर्श यांना फर्माईश केली, मुंडेंच्या या फर्माईश गीतानेच कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले.
पंडित अण्णा मुंडे व प्रल्हाद शिंदे यांचा जवळचा स्नेह होता. तेव्हापासून मुंडे आणि शिंदे कुटुंबियांचे ऋणानुबंध आहेत. आज आमच्या पिढीतही ते स्नेहाचे बंध टिकून आहेत. त्याच परंपरेला पुढे घेऊन जात परळीतून मुंडे कुटुंबियांचे जेव्हा बोलावणे येईल,तेव्हा मी हजर होईल, असे सिनेगायक आदर्श शिंदे यांनी म्हटले आहे.