मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून राज्यभर निषेध केला जात आहे. आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर कॉंग्रेस आंदोलन छेडणार होते. तर दुसरीकडे या आंदोलनाविरोधात भाजपा प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्या घराजवळ जमा झाले होते.
मात्र नाना पटोले यांच्या घराच्या गेटसमोरच पोलिसांनी त्यांना अडवले आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सुरक्षाव्यवस्थेला पार करत आतमध्ये प्रवेश केला. अतुल लोंढे एकटेच सागर बंगल्याच्या परिसरात शिरले होते. त्यानंतर पोलिसांनी अतुल लोंढे यांच्या अक्षरश: मुसक्या आवळल्या. तसेच ते घोषणा देत असतांना त्यांचे तोंड दाबून ठेवले आणि त्याच अवस्थेत लोंढे यांना गाडीत कोंबण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,’काल मोठ्या रुबाबात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी निवासस्थानासमोर प्रचंड निदर्शने करण्याची टिमकी वाजवली आणि आज प्रत्यक्षात अतुल लोंढे एकटेच आले. याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण’, असे भातखळकर म्हणाले आहेत.