राज्यातील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या सर्व १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. एकीकडे भाजपकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे.
तसेच या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रविण दरेकर यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे
यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’सर्वोच्च न्यायालयाने १२ आमदारांचे निलंबन रद्द करुन निश्चितच आम्हांला दिलासा दिला आहे. शेवटी सत्याचा विजय झाला. बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे सरकार सूड भावनेने करु पाहत होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द करुन सरकारला झटका दिला. इतकेच नाही तर अनेक गंभीर आक्षेप सुद्धा न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे’, असे दरेकर म्हणाले आहेत.