नवी दिल्ली | शिवसेना कार्यकर्ते संतोष परब मारहाण प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी राणेंनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राणेंच्यावतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी बाजू मांडणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना प्रचारक संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वी ड्रग्सप्रकरणात सापडलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची बाजू रोहतगी यांनी मांडली होती. आता राणेंना या प्रकरणात ते दिलासा मिळवून देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच याकडे सर्व राज्यातील राजकीय वर्तुळातून नजर एकटवल्या आहेत.
मुकुल रोहतगी हे नितेश राणे यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. हाय कोर्टात राणेंच्या वकिलांऐवजी रोहतगी यांची निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हाय कोर्टाच्या आदेशाला राणेंनी आता सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून काल प्रथमच कणकवली पोलिसांसमोर नितेश राणे हजर झाले होते. त्यांची सुमारे पाऊण तास कणकवली पोलीस ठाण्यात चौकशी झाली.