राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यावर बोचरी टीका केली आहे.किरिट सोमय्या म्हणजे हे एखाद्या चित्रपटातील आयटम गर्ल असल्याची बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. मलिक यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठणार असल्याचे म्हटले जात आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी किरिट सोमय्या यांच्यावर टीका केली. नवाब मलिक यांनी म्हटले की, एखाद्या चित्रपट चांगला चालावा यासाठी चित्रपटात आयटम गर्लची आवश्यकता असते. किरिट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपच्या आयटम गर्लप्रमाणे आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी राजकारणातील आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका मलिक यांनी केली.
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सातत्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांविरोधात आरोपांची मालिकाच सुरू केली होती. या पक्षांच्या काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाईदेखील सुरू केली आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून होणाऱ्या आरोपांना राष्ट्रवादीकडूनही जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे.