राज्याच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सध्या जोरदार जुगलबंदी रंगली आहे. एसटीचा संप, गृहखात्याचा कारभार, एनसीबीची कारवाई, यावरून जोरदार कलगीतूरा रंगला आहे. एसटी संप संपण्याचं नाव घेत नाही. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राज्याच्या वाहतुकीचा कणा म्हणून ओळखण्यात येणाऱ्या लालपरीची चाकं सध्या थांबली आहेत. सरकारकडून पगारवाढीची घोषणा करूनही संप मिटला नाही. तरी या आंदोलनात सहभागी झालेले आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतली आहे. परिणामी या दोन्ही नेत्यांवर सर्व स्तरातून जोरदार टीका केली जात आहे.
गृहपाठ न केल्यानं तोंडावर पडावं लागतं. शेतकरी आंदोलन वेगळं आणि इतर आंदोलन वेगळं, अशी जोरदार टीका राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर केली आहे. चळवळ म्हणजे एकप्रकारचा वाघ आहे. या वाघावर स्वार होणं हे सोपं नाही. एकदा स्वार होऊन परत पायउतार होणं हे कठीण आहे. पायउतार झालात तर तो वाघच तुम्हाला खाऊन टाकतो, असंही शेट्टी म्हणाले आहेत.
दरम्यान, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनातून माघार घेतली आहे. पगारवाढीचा निर्णय हा मार्ग काढण्यात आला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघावी, असं वक्तव्य खोत यांनी केलं आहे.