मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणाची ससेमिरा मागे लागली आहे. त्यातच अनेकांवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. याच अप्र्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ‘दोन-चार मंत्र्यांना मुद्दाम बदनाम करून तुरुंगात टाकलात तर बाकीचे आमदार आहेतच की! आमच्याकडे कशाचीही कमी नाही. तुम्ही किती जणांना बदनाम करणार? किती लोकांना आत टाकणार?’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपला केला आहे.
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजप ऐनकेन प्रकारेण राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे सरकार लवकर जावं ही भाजपची इच्छा आहे, मात्र देशाच्या घटनेच्या चौकटीत राहून आम्ही काम करतोय त्यामुळे सरकार बरखास्त करायचा अधिकार पुणाला नाही. शिवाय चारचौघांची इच्छा असली तरी सरकार बरखास्त होऊ शकत नाही. विधानसभेत जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत सरकार जाणं शक्य नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
ईडीची धाड पडणं हे आता नित्याचंच झालं आहे. जनतेला भाजपच्या या खेळाची सवय झाल्याने याचं विशेष अप्रूप वाटत नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे म्हणून भाजपकडून येथे सर्व यंत्रणांचा वापर केला जात आहे मात्र त्यांचे सरकार असते तर एकदाही छापेमारी झाली नसती, असा दावाही पाटील यांनी केला.