मुंबई | पुन्हा राज्यात आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या ईडीआणि सीबीआय’च्या कारवाईवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर अर्थात भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. जे तलवार चालवतात ते तलवारीच्याच घावाने मरत असतात. तलवारीची मूठ आमच्याही हाती येईल.तेव्हा हे शस्त्र तुमच्यावरच उलटलेलं असेल, असा इशारासंजय राऊतयांनी दिला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. आम्ही सगळ्यांना अंगावर घ्यायला तयार आहोत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून महाविकास आघाडीचे नेते आणि नातेवाईकांना त्रास देण्याचं काम करत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठी उभा आहे. नीचपणाचा कळस आणि कपट काही राजकीय पक्ष करत आहेत. पण हे कारस्थान त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे तुमच्या घरचे नोकर आहेत अशा प्रकारे काम करत आहेत. आम्ही घाबरत नाही. ईडीचे अधिकारी आमच्याकडे येऊन गेले. परत या आम्ही स्वागताला तयार आहोत. तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. २०२४ नंतर हे शस्त्र तुमच्यावर उलटेल. हे शस्त्रं तुमच्यावर उलटेल हे तुम्हाला सांगतो. जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात. तलवारीची मूठ आमच्याकडेही येईल. तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही. कितीही कपट कारस्थान करताय ते करा. पण तपास यंत्रणांनी त्यांचे मोहरे बनू नये, असा इशारा राऊत यांनी दिला.