राज्यात एकीकडे सणासुदीच्या दिवसात एसटी कर्मचारी वर्गाने संप पुकारला आहे 28 टक्के महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता आणि वेतनवाढ या मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. जवळपास १७ कामगार संघटनाच्या कृती समितीने २८ ऑक्टोबरला आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतरही काही मागण्यांसाठी राज्यातील काही आगारांत संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
राज्यातील २५० पैकी ३९ आगारांमध्ये संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून, सोमवारपासून कामगार कामावर रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी रविवारी जाहीर केले. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कामगारांना संपास भाग पाडणे, आगारांना टाळे लावणे आदी प्रकार घडल्याचे एसटी महामंडळाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याविरोधात महामंडळाने ठिकठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रोरीही नोंदविल्या आहेत.
दरम्यान संप मिटत नसल्याने ऐन दिवाळीत महामंडळालाही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांची समजूत काढून आगार सुरू करण्याचा प्रयत्न के ला जात होता. रात्री आठपर्यंत ३९ पैकी आठ आगारे सुरू झाली. उर्वरित मात्र बंदच होते. औद्योगिक न्यायालयानेही संपाला स्थगिती आदेश दिला असताना त्याचाही अवमान केला जात आहे.