मुंबई | सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यासहित राज्यातील ५ साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. हे सर्व कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे समजत आहे. माझे नातेवाईक आहेत म्हणून धाड टाकली असेल, तर राज्यातील जनतेला विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
“आयकर खात्याने कुठे छापे मारावेत हा त्यांचा अधिकार आहे. माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचा कर वेळच्यावेळी योग्य पद्धतीने भरलेला आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याबाबत मला काही बोलायाचं नाही. पण माझ्या तीनही बहिणींशी संबंधित कंपन्यांवरसुद्धा छापे मारण्यात आले आहेत. माझे कुटुंबिय म्हणून फक्त छापे मारणं हे खालच्या पातळीचं राजकारण आहे. अनेक सरकारं येतात जातात. पण जनता सर्वस्व आहे,” असं अजित पवार यांनी याबाबत म्हटलंय.
“माझ्या बहिणींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कंपन्यांशीही त्यांचा काही संबंध नाही, केवळ त्या माझ्या बहिणी आहेत, रक्ताचं नातं आहे म्हणून धाड टाकली हे दुःख देणारं आहे,” असंही अजित पवार म्हणाले आहेत. दौंड शुगर, आंबलीक शुगर, जरंडेश्वर साखर कारखाना, पुष्पद नतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याचं वृत्त येतं आहे.