शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या भुजबळ धमकी प्रकरणाच्या आरोपानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस आता आमदार कांदे यांच्यासह अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइं आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना समन्स बजावणार असून, दोघांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि पालकमंत्री छगन भुजब आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून या प्रकरणाची माहिती आता पक्षनेतृत्वांच्या कानापर्यंत गेली आहे. तसेच आमदार कांदे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप छगन भुजबळ यांच्यावर लगावले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळांविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे कांदे यांनी म्हटले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्रही दिले. मात्र, या प्रकरणाला एकदम कलाटणी मिळाली. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले.
आमदार सुहास कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यासाठी मी सुहास कांदे यांना फोन केला होता. त्यांना फोनवर मी कुठलिही धमकी दिली नाही. छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही. मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना भेटलो सुद्धा नाही. त्यामुळे मी आमदारांचीच तक्रार करत त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला. शिवाय कांदे हे सारे लोकप्रियतेसाठी करून विनाकारण पोलिसांची दिशाभूल करत आहेत असा आरोप त्यांनी लगावला होता.