मुंबई | – भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर घोटाळ्यांबाबत पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्याची मालिका सुरु केली आहे. भ्रष्टाचारासंदर्भातील आरोप सातत्याने सोमय्यांकडून केले जात आहेत. किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी तब्बल १०० कोटीच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. ७२ तासाच्या आत सर्व ट्विट डिलीट करण्याचा तसेच बिनशर्त माफी मागण्याचा इशारा नोटीसीत देण्यात आला आहे. त्यावर आता किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी असल्या फडतूस नोटीसी आणि धमक्यांना घाबरत नाही. अलिबाबा चाळीस चोरांचे ठाकरे सरकार आहे. जेलमध्ये या घोटाळेबाजांना पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आतापर्यंत २६ घोटाळे उघडकीस आले आहेत. काहींमध्ये अधिकारी तर काहींमध्ये नेते आहेत. ११ जणांची यादी मी तयार केली होती आणि आता त्यामध्ये तिघांचा समावेश झाला आहे. आता माझे सहकारी आणखी तीन घोटाळ्यांवर काम करत असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
दिल्लीमध्ये कोणाची भेट घेण्यात आली असे माध्यमांनी विचारले असता सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना हसन मुश्रीफ यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात भेटलो. तुमचे पुरावे हे मजबूत आहेत आणि तपास सुरु झाल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे निश्चितपणे हसन मुश्रीफांवर कारवाई होणार, असे सोमय्या म्हणाले. हसन मुश्रीफ यांच्यानंतर कोण असा प्रश्न विचारला असता, जी कागदपत्रे माझ्याकडे आहेत त्यात एक विदर्भातील काँग्रेसचे मंत्री आहेत, एक शिवसेनेचे मंत्री आहेत आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ परिवारातील एका सदस्याचा समावेश असल्याचे सोमय्या म्हणाले.