मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसेच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करत अनेकांनी आदरांजली वाहिली आहे. याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता.
या हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमवला. या मन हेलावणाऱ्या घटनेला आज १३ वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी अमित मालवीय यांनी अनेक गंभीर आरोप यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केले आहे.
मालवीय यांनी एका वृत्तपत्राची बातमी शेअर करत ‘जेव्हा २६/११ ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते, हे विसरणार नाही’, असे म्हंटले आहे. ही वर्तमानपत्राची कात्रण दरवर्षी २६/११ च्या निमित्ताने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाते. या अहवालानुसार, मुंबईतील हल्ल्यानंतर लगेचच राहुल गांधी दिल्लीतील एका पार्टीत दिसले होते.