मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील कोरोना परिस्थिती आणि त्या-त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केलेली कामगिरी या बाबत चर्चा सुरु आहे. तसेच अनेक राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये विद्यामान मुख्यमंत्र्यांबाबत नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे.
ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेही चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यातच आता ‘प्रश्नम’ यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरल्याचं समोर आलं. देशात ६७ टक्के लोकसंख्या असलेली १३ राज्ये या सर्व्हेसाठी निवडण्यात आली होती. मात्र आता या सर्वेक्षणावर माजी खासदार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, १३ राज्यातील १७ हजार लोकांनी मतं दिली आहेत. भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. महाराष्ट्रात जवळपास ११.५ कोटी लोक राहतात आणि देशात एकूण २९ राज्य आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील, असं निलेश राणेंनी या सर्वेक्षणामधील सॅम्पल साइजच्या आकडेवारीची माहिती शेअर करत म्हटलं आहे.