पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावी आणि | सीईटीच्या प्रत्येकी 50 टक्के गुणांचा विचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘सीईटींची संख्याही कमी करून प्रवेशप्रक्रिया 1 जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष हे सीईटींवर केंद्रित झाले असून, बारावीच्या वर्गांमध्ये विद्यार्थीच बसत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावी आणि सीईटीच्या गुणांना प्रत्येकी 50 टक्के वेटेज देण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत.
तसेच ‘जेईई मेन’ची परीक्षा दोन टप्प्यांत होते. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांना गुण स्कोअर करण्याची संधी मिळण्यासाठी पुन्हा एकदा सीईटीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये होत असल्या, तरी त्यांचा निकाल परीक्षा झाल्याच्या दिवसापासून 10 दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.
‘राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय झाला. हा निर्णय सर्व कुलगुरूंनी घेतला होता. मात्र, काही ठिकाणी प्रचलित पद्धतीनुसार, तर काही ठिकाणी ऑफलाइन ‘एमसीक्यू’ पद्धतीने परीक्षा होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षापद्धतीत एकसमानता येण्यासाठी उच्च शिक्षण संचालक डॉ. माने यांनी बैठक घेऊन निर्णय घ्यायचा आहे. राज्यातील विद्यापीठांनीदेखील विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी परीक्षांबाबत घेतलेला निर्णय राबवावा. परीक्षांचा निर्णय कुलगुरूंनी घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले.