११ ऑक्टोबरचा बंद राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी, आरोपींना अटक का नाही?
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱयांना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली.यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
ऑक्टोबर रोजी होणारा महाराष्ट्र बंद हा राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणारा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत हे दाखवून देण्यासाठी आहे. तसेच लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेचा धिक्कार करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना सरकार का वाचवत आहे? कुणासाठी वाचवत आहे, असा संतप्त सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. लाखीमपूर खिरी या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं. त्याची सर्वोच्च न्यायालयाने स्यूमोटोद्वारे दखल घेतली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. जे यात मृत झाले त्यांना न्याय मिळेल. केंद्र सरकार कोणती माहिती लपवत आहे. आरोपींची नाव ओळख निष्पन्न झाली आहेत तरी त्यांना का अटक केल्या जात नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे.