इस्लामपूर | संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या वाढून मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र तसेच राज्य सरकारकडून हाती घेण्यात आलेला आहे. आज अनेकजण कोरोनाच्या भीतीने आपल्या प्राणाला मुकताना दिसत आहे. अशा या भीतीपोटी अनेकांनी लसीसंदर्भात अनेक गैरसमज मनात भरवून घेतले आहे.

मात्र या परिस्थितीत देखील काही लोक आहेत ज्यांनी कोरोनावर मोठ्या धाडसाने आणि हिमतीने मात केली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सध्याचं एकमेव अस्त्र म्हणजे, कोरोनाची लस. सांगलीतील इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरीना अब्दुल शेख या आजींनी कोरोनाला आपल्या जवळपास तर फिरकू दिलेच नाही, न घाबरता लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून जिद्दीने लढण्याचा संदेश इतरांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री यांनी आज दोन्ही डोस पूर्ण केल्याबद्दल १०८ वर्षीय जरीना अब्दुल शेख यांची भेट घेऊन त्यांचा साडी चोळी देऊन सत्कार केला. इस्लामपूर येथील जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते, हे आज जरीना आजीने दाखवून दिलं आहे. लसीकरण हेच कोरोनावरील रामबाण उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने लसी घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावं, असं आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केलं आहे.
